विशेष कार्यक्रम

-- नवरात्रोत्सव --

आश्विन शु || १ पासून हा उत्सव सुरु होतो. याठिकाणी विविध गावोगावांहून आलेले भक्त मंदिरामध्ये नऊ दिवस मुक्काम करतात. अनेक भक्त नऊ दिवस कडक उपवास करतात, अनवाणी राहतात. मंदिरामध्ये अश्विन शु || प्रतिपदेला घटस्थापना करून रोज देवीची पूजा आरती केली जाते. पहाटे ५-३० वाजता काकडा आरतीला व सायंकाळी ५-३० वाजता आरतीसाठी पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. घठाला रोज वेगवेगळ्या फुलांची माळ व गोड नैवेद्य ठेवतात. नऊ दिवस रोज जागर, देवीची गाणी, भजन, प्रवचन इ. कार्यक्रम होतात. आश्विन शु || सप्तमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. त्यादिवशी बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन केले जाते. भक्तांचे मनोरथ व नवस पुर्ण करीत असलेल्या या देवीचे नवस फेडण्यासाठी अनेक भक्त याठिकाणी साष्ठांग दंडवत घालतात, गूळशेरणी, खोबरे व पेढे वाटतात. तसेच दिपामाळेला तेल घालतात. अष्टमीला होम हवनाचा कार्यक्रम होतो.

देवीचे पुजारी शेळके यांच्या घराण्याकडे गेली अनेक पिढ्या या देवीचा मान चालत आला आहे. त्याप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी संपूर्ण पालखीची सजावट करून देवीला पालखीमध्ये घेऊन पालखी मंदिरातून कै. सटवाजीबुवा शेळके यांच्या स्मारकाजवळ नेली जाते. तेथून सीमोल्लंघनसाठी (शिलांगणासाठी) गावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या खंडोबा देवस्थानच्या पादुका असलेल्या ठिकाणी नेली जाते. या ठिकाणी सर्वजण सीमोल्लंघन करतात. आपट्याच्या झाडाची पूजा करून सोने लुटून आणतात. मित्रमंडळी एकमेकांना व थोरामोठ्यांना नमस्कार करतात. पालखीची गावामधून मिरवणूक चालू असताना ठिकठिकाणी महिलांना दर्शनासाठी पालखी थांबविली जाते. सर्वजण पालखीला ओलांडा घेतात व पालखीला खांदा देतात. पालखी मिरवणूकीनंतर मानकरी शेळके यांच्या वाड्यात ठेऊन त्याठिकाणी रात्रभर जागर, देवीची गाणी व आरती इ. कार्यक्रम गोंधळ्यांकरवी केले जातात.

Go Top